लोंढे हॉस्पिटल ते पन्नालालनगर पर्यंत सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनमध्ये पडून वृद्धाचा मृत्यू

Foto
 लोंढे हॉस्पिटल ते पन्नालालनगर पर्यंत सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनमध्ये पडून वृद्धाचा मृत्यू
पैठण, (प्रतिनिधी) : शहरातील वादग्रस्त लोंढे हॉस्पिटल ते पन्नालालनगर पर्यंत सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनमध्ये पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला. 

या वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या मुख्याधिकारी डॉ पल्लवी अंभोरे, अभियंता पंकज पवार, एजन्सी धारक व खाजगी ठेकेदार यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी उबाठा चे शहर उपप्रमुख कल्याण गोविंदराव मगरे यांनी उप विभागीय पोलीस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील लोंढे हॉस्पिटल ते पन्नालाल नगर येथील ड्रेनेज लाईनचे काम गेल्या चार महिन्यापासून सुरू आहे. सदरील ड्रेनेज लाईनचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे या संदर्भात अनेक तक्रारी झाल्यामुळे सदरील काम अर्धवट अवस्थेत पडून आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ड्रेनेज लाईन मध्ये पाणी साचल्याने २७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास किसन गणपतराव उदावंत हे छत्रपती शाहू महाराज चौकासमोर अर्धवट खोदून ठेवलेल्या ड्रेनेज लाईन मध्ये साचलेल्या पाण्यात पडून मरण पावले आहे.
 
सदरील ड्रेनेज लाईनचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी भवानी नगर यशवंत अभियंता नगर, अन्नपूर्णा नगर, इंदिरानगर, या भागातील नागरिकांनी मुख्याधिकारी, नगरपरिषद कार्यालय यांच्याकडे करण्यात आली होती. काही सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांनी आमरण उपोषण केले होते. परंतु न. प.  मुख्याधिकारी, अभियंता यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे सदरील इसमाचा बळी गेला आहे. या इसमाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, अभियंता पंकज पवार, संबंधित एजन्सी व खाजगी गुत्तेदार यांच्यावर सदोष मनुष्य वाधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.